Top News

गावांच्या एकात्मिक विकासासाठी अधिकाऱ्यांना गाव दत्तक देणार. निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर. नवतेजस्विनी महोत्सवाचा उत्साहात समारोप

धाराशिव -  पोकरा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३८ गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांचा संपूर्ण एकात्मिक विकास साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १० युवकांची निवड करून त्यांना निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणामध्ये युवकांना मोबाईलपासून दूर ठेवत योगा,प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया शिकविण्यात येणार आहे.या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले.

आज धाराशिव येथील शहर पोलीस स्टेशनजवळील उस्मानाबाद क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत दि. २७ ते २९ मार्च या कालावधीत आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव,महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी भुजंग भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर,लेखाधिकारी विजय स्वामी,राजाभाऊ शिंदे,सुरेंद्र कांबळे,बाबा शेख,तालुकास्तरीय लोक संचलित साधन केंद्राध्यक्ष निर्मला उबाळे,स्मिता पाटील,सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना कडवकर म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात माविमच्या ४९ गावांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार असून युवकांचे मन,मनगट आणि मस्तिष्क बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ‘माविम मित्र’ म्हणून गावातील पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादांमध्ये योग्य ते समुपदेशन करून कुटुंबातील समन्वय राखण्याचे आवाहन त्यांनी केले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बचत गटातील महिलांनी पुढाकार घ्यावा, तसेच शेतमालाच्या पॅकिंगवर भर द्यावा,असेही त्यांनी सांगितले.

विशेषतः विषमुक्त शेतीवर भर देत महिलांनी विषमुक्त भाजीपाला व फळांचे उत्पादन केल्यास पुणे व मुंबईतील बाजारपेठांमध्ये कायमस्वरूपी व नफा देणारी संधी उपलब्ध करून दिली जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले.त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळून त्यांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होईल आणि विविध समस्या सोडविण्यास मदत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच गावातील व्यसनाधीन मुलांची माहिती संकलित करून त्यांना दोन महिन्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.त्यांच्या आवडीनुसार कंपनी, हॉटेल्स,प्लंबर,हॉस्पिटल तसेच इतर क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्तीच पुढे जातो,तर काम न करणारा कितीही श्रीमंत असला तरी मागे पडतो, असे त्यांनी नमूद केले.मुलांच्या व्यसनाधीनतेसाठी केवळ त्यांनाच दोष देणे चुकीचे असून त्यांच्या संस्कारांमध्ये आपण कमी पडलो आहोत,असेही त्यांनी स्पष्ट केले.मुलांना जमिनीशी जोडल्याशिवाय त्यांची मानसिकता बदलणार नाही,असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून हा माल अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन कडवकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी केले.सूत्रसंचालन सीएमआरसी सहव्यवस्थापक किशोर टोम्पे यांनी तर आभार प्रदर्शन विजय स्वामी यांनी केले.या कार्यक्रमास माविमचे तालुका व्यवस्थापक किशोर टोम्पे,महादेव पवार,श्रद्धा एडके,आकाश जोगी, निर्मला शिंदे,राजश्री ढोबळे,माया कांबळे,तालुका उपजीविका सल्लागार सिद्धांत मस्के,पांडुरंग गायकवाड,ऋषी हिंगे, संजीवनी लोंढे,आकांक्षा गायकवाड तसेच सर्व सहयोगिनी, सीआरपी,कार्यकारिणी सदस्य, माविम मित्र,स्टॉलधारक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
              

Post a Comment

Previous Post Next Post