बेरडवाडीत दुहेरी हत्याकांड; पत्नी आणि ८ वर्षीय मुलीचा कुऱ्हाडीने खून उमरगा तालुक्यात खळबळ; आरोपी वडील स्वतः मुरूम पोलिसांत हजर


उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे मंगळवारी पहाटे अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीसह अवघ्या आठ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत लिंबाबाई अजित वासुदेव आणि त्यांची मानसी (वय ८) या माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्या घरातच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अजित वासुदेव याने मंगळवारी (ता. ७) पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास थेट मुरूम पोलिस ठाण्यात हजर होत पत्नी आणि मुलीचा खून केल्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या दुहेरी हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी कुटुंबातील वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमुळे बेरडवाडी परिसरात शोककळा पसरली असून, निष्पाप चिमुकलीचा गेलेला बळी समाजमनाला चटका लावून गेला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post